विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होईल! सप्टेंबरअखेर अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा टप्पा होणार पूर्ण

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. पुण्यात उपजिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडल्यानंतर आता नोडल अधिकारी, सेक्टर अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शनिवारी होणार आहे.आयोगाच्या निर्देशानुसार सप्टेंबरअखेर प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे.

राज्यस्तरीय मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून आता शनिवारी अधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानापूर्वी दोन महिने अगोदर प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण केला जात आहे. सध्याच्या कार्यवाहीनुसार राज्याच्या विधानसभेची निवडणूक १५ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होवू शकते.

दिवाळीनंतर निवडणूक होऊन २३ नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल, असेही वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यावर मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.