प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर सांगलीकर प्रवाशांनी भरभरून प्रेम व्यक्त करीत तिकीट विक्रीचा मोठा विक्रम नाेंदविला. बुकिंगच्या पहिल्याच दिवशी सांगली-पुणे व पुणे-सांगली या मार्गावर वंदे भारतच्या दोन गाड्यांमध्ये एकूण १७५ तिकिटे सांगलीकरांनी काढली.यातून सुमारे सव्वा लाखाचे उत्पन्न त्यांनी रेल्वेला दिले.
हुबळी-सांगली-पुणे वंदे भारत गाडीत पहिल्या दिवशी सांगली स्थानकापासून शंभर तिकिटांची विक्री झाली. गाडी (क्र. २०६६९) हुबळी-सांगली-वंदे भारत गाडीत सांगली स्टेशनवरून सकाळी सहा वाजेपर्यंत ९० तिकिटे विकली गेली. सकाळी ७ ते सव्वा नऊच्या दरम्यान सांगली स्टेशनवरून वंदे भारत सुटण्याच्या आधी करंट बुकिंगमध्ये आणखी दहा ते बारा तिकिटे विक्री झाली.
पहिल्याच दिवशी वंदे भारत गाडीने सांगली रेल्वे स्थानकावरून एकाच फेरीत शंभर तिकिटांची विक्री पार केल्यामुळे एक नवा विक्रम सांगलीच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर पुणे-सांगली-कोल्हापूर वंदे भारत गाडीत पुणे ते सांगली या परतीच्या मार्गावर ७५ तिकिटांची विक्री झाली.