आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावापावरून तसेच गेल्या पाच वर्षांपासून बदललेल्या राजकीय संदर्भांमुळे चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमधील पक्षांमध्ये उमेदवारीवरून संघर्ष अटळ असल्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूरमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीमधील सहयोगी असलेल्या इचलकरंजीचे आमदार प्रकाश आघाडी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी थेट चार मतदासंघात उमेदवार जाहीर करत महायुतीला धक्का दिला आहे.
जागावाटप होण्यापूर्वीच दोन्ही नेत्यांनी उमेदवार जाहीर केल्याने पन्हाळा शाहूवाडी, करवीर, इचलकरंजी, हातकणंगले मतदारसंघात महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. दुसरीकडे, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला होता.
मात्र, आता त्यांच्या शाहू विकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राजेंद्र पाटील आपल्याच पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ज्या नेत्यांवर महायुतीची मदार होती त्यांनीच घेतलेल्या भूमिकेनं महायुतीला तगडा हादरा बसण्याची चिन्हे आहेत. कागलमधून हसन मुश्रीफ यांना कागल दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला सोडचिट्टी देत तुतारी फुंकली आहे. त्यामुळे कागलमध्ये सुद्धा महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही लोकनियुक्त आमदार किंवा खासदार नाही. खासदार धनंजय महाडिक राज्यसभेवर आहेत. त्यामुळे जिल्हा भाजपचे नेतृत्व त्यांच्याकडेच आहे. आमदार प्रकाश आवाडे आणि विनय कोरे भाजपचे सहयोगी आमदार आहेत, तर राजेंद्र पाटील यड्रावकर शिंदे गटाचे सहयोगी आमदार आहेत.
मात्र, आवाडे आणि कोरे यांनी स्वतंत्र भूमिका घेत महायुतीवर दबाव वाढवला आहे. कागलमध्ये सुद्धा धनंजय महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.