लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभेचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये राजकीय घटनांना वेग आला असून विधानसभा निवडणूकीपूर्वी सोलपुरात भाजप आणि अजितदादा गटातील दिग्गज नेते हातात तुतारी धरण्याच्या तयारीत आहेत.लोकसभेमध्ये झालेल्या दारुण पराभवामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा महाआघाडीने जिंकल्या होत्या.
यामुळे आता विधानसभेला महायुतीतील अनेक विद्यमान आमदार व दिग्गज नेते हे महायुतीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसून या नेत्यांची शरद पवार यांच्याकडे तिकीट मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीला आणि प्रामुख्याने भाजपाला बसणार याची जाणीव असल्याने अनेक नेते जरांगे यांची एकाबाजूला भेट घेत असून दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत .
सांगोल्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे हेही या वेळेला शिवसेना आमदार शहाजी बापू यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत मात्र महायुतीची ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने दीपक साळुंखेही शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण मतदार संघात यावेळी शरद पवार यांची तुतारी हाती घेण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज प्रयत्न करीत असल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी विधानसभेपूर्वी अनेक धक्के पचवावे लागणार आहेत.
