महाराष्ट्र राज्यामध्ये अलीकडच्या इतिहासामध्ये दोन प्रादेशिक पक्षांमध्ये विभाजन होऊन त्यांचे चार पक्ष झाले असल्यामुळे आता मोठ्या आणि राजकारणाच्या मैदानात असलेल्या मुख्य पक्षांची संख्या सहा झाली आहे.याव्यतिरिक्त आकाराने लहान असणारे इतर तीन-चार पक्षही राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीत आठ ते नऊ पक्ष एकमेकांशी झुंज देणार, अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जर तिसरी आघाडी स्थापन केली, तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर काय आणि कसा परिणाम होईल? हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शिवसेना (उबाठा) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये मुख्य लढा असला, तरी आता काही अपक्ष नेते आणि काही छोट्या पक्षांचे नेते यांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या आठवड्यातच पुणे शहरांमध्ये अशा पक्षांच्या नेत्यांची एक बैठक झाली आणि त्यात सकारात्मक चर्चा झाली, असे नेत्यांनी सांगितले.
यामध्ये शेतकरी आंदोलनाचे नेते राजू शेट्टी, माजी राज्यसभा सदस्य संभाजीराजे छत्रपती आणि विदर्भातील राजकारणात अतिशय सक्रिय असलेले बच्चू कडू या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांनी आणि प्रकाश आंबेडकर व अन्य काही नेत्यांनी एकत्र येऊन, जर तिसरी आघाडी स्थापन केली, तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर काय आणि कसा परिणाम होईल? हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.