ना नेते ना कार्यकर्ते, शिंदेंचा गोपनीय दौरा अन् प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ

ना नेत्यांचा लवाजमा ना कार्यकर्त्यांची गर्दी. ना पोलिसांचा ताफा ना प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ. अत्यंत गोपनीय पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले. कणेरी येथील सिद्धगिरी मठावरील कार्यक्रम त्यांनी केला व ते माघारी गेले. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला दौरा गोपनीय ठेवल्याची चर्चा मात्र रंगली.

मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या राज्यव्यापी आंदोलनात मंत्री आणि राजकीय नेत्यांना ठिकठिकाणी गावबंदी केली आहे. शुक्रवारी (ता.२७) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही आंदोलकांनी घेराव घातला. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ८ वाजता कोल्हापूर विमानतळावर आले. त्यांनी नेहमीचा पोलिस ताफाही बरोबर घेतला नव्हता. त्यांच्या स्वागताला विमानतळावर पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त या पैकी कोणीच नव्हते.

मुख्यमंत्री येणार याची माहिती ना पोलिस यंत्रणेला होती ना प्रशासनाला होती. तेथून मुख्यमंत्री मोजक्या लोकांसह थेट कणेरी येथील सिद्धगिरी मठावर पोहचले. यावेळी खासदार संजय मंडलिक यांचा अपवाद सोडता शिवसेनेचा एकही पदाधिकारी, नेता, आमदार येथे उपस्थित नव्हता. या ठिकाणी शिंदे यांच्या हस्ते गायीच्या वंध्यत्व निवारण केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. कार्यक्रम संपल्यावर ते पुन्हा विमानाने मुंबईला गेले. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा इतका गोपनीय ठेवल्याने त्याची चर्चा मात्र रंगली.