हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या दारूभट्टीवर धाड टाकून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल हातकणंगले पोलिसांनी जप्त केलेला आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, माणगाववाडी येथे या अगोदरही अनेक हातभट्टींवर छापे टाकून त्या हातभट्ट्या उध्वस्त करूनही आणखी हातभट्टी चालू असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार हातकणंगले पोलीस ठाण्याचे पो. नि.शरद मेगाने यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत अचानक धाड टाकली. यावेळी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या जागा मालकाने तेथून पळ काढला. यावेळी पोलिसांनी जागेवरच जवळपास तीन लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये तयार दारू, कच्चे रसायन, बॅरेल, ॲल्युमिनियम बादली इत्यादींचा समावेश आहे.
माणगाववाडी येथे पोलिसांनी छापे टाकल्यानंतर काही काळ हातभट्टीची दारू बंद होते व नंतर काही दिवसांनी ती पुन्हा सुरू होत असल्याने यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.