विधानसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता पुढील महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वी राज्यात घडामोडींना ऊत आला आहे. केंद्रीय नेतृत्वाचे राज्यातील दौरे वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत सीट शेअरिंगची घडी बसविण्याचे डावपेच सुरू आहे. कधी गोड, कधी कडू अनुभव गाठीशी बांधत दोन्ही गटात जमवाजमव सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी पक्षात फुटीनंतर पक्ष आणि पक्ष चिन्हावरुन पुन्हा एकदा लढाई सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत असा तोडगा काढण्याची विनंती शरद पवार गटाने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या. अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्याची मागणी करायला सांगा. निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून शुक्रवारी सुप्रीम कोर्टासमोर प्रकरण समोर आणण्यात आले. हे प्रकरण लवकर ऐकण्याची विनंती शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. या प्रकरणावर २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्ट नक्की सुनावणी कधी घेणार हे आज येणाऱ्या कोर्टाच्या प्रकरण यादीवरुन स्पष्ट होईल. यापूर्वी देखील २ वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेंशन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यावर सुनावणी झाली नाही.