इचलकरंजी शहरवासीयांची पाणी जपून वापरण्याचे आवाहन! कृष्णा योजनेच्या पंपात बिघाड पाणीपुरवठा ठप्प

इचलकरंजी शहरांमध्ये नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी नागरिकांनी आंदोलने देखील केलेली आहेत. तसेच अनेक काही तांत्रिक अडचणीमुळे, बिघाडामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागते. इचलकरंजी शहरास कृष्णा नदी पाणी पुरवठा योजना मजरेवाडी येथुन दोन पंपाद्वारे पाणी पुरवठा करणेत येतो.तथापि यापैकी एक पंप शनिवार दि.२० सप्टेंबर रोजी दुपारी नादुरुस्त झालेला आहे. नादुरुस्त पंप दुरुस्त करणेसाठी बंद ठेवणेत आलेला आहे.

परिणामी सध्या शहरास एकाच पंपाद्वारे पाणी उपसा करून पाणी पुरवठा करणेत येत आहे. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा अवेळी व कमी दाबाने होणार आहे. याकरिता महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे. सदर पंप दुरुस्तीचे काम हाती घेतले असून दुरुस्ती साठी दोन दिवस लागणार आहेत.

त्यामुळे मंगळवार दि.२४ सप्टेंबर पर्यंत पंप दुरुस्त करून शहरास नियमितपणे पाणी पुरवठा करणेचे नियोजन पाणी पुरवठा विभागाचे वतीने करणेत आलेले आहे. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या कडील पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.