रविवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील कोलकत्ता दौऱ्यावर गेले होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे महाराष्ट्रातील तमाम मराठी गलाई बांधवांनी भव्य दिव्य असे स्वागत केले. त्यानंतर हजारो गलाई बांधवासमवेत दिपकआबांनी कोलकत्ता येथील सुप्रसिद्ध कालीमाता यांचे दर्शन घेऊन कोलकत्ता येथील अग्रेसर सेवा समिती हॉलमध्ये तमाम मराठी गलाई बांधवांशी संवाद साधला. यावेळी मराठी गलाई बांधवांनी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून सन्मान केला.
यावेळी गलाई बांधवांनी आपल्या अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्यांचे निवेदन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना दिले. संपूर्ण देशभर विस्तारलेल्या गलाई बांधवांच्या प्रमुख मागण्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्यक्रमाने प्रयत्न करणार आहोत. गलाई व्यवसायांचा सूक्ष्म व लघु उद्योगास समावेश करणे तसेच पोलिसांच्या नाहक त्रासापासून गलाई बांधवांचे संरक्षण करणे आणि प्रत्येक राज्यात प्रामुख्याने आसाम आणि पश्चिम बंगाल महाराष्ट्र भवन उभा करण्याची मागणी गलाई बांधवांनी केली.
यावेळी गलाई बांधवांच्या खांद्याला खांद्या लावून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली. यावेळी यंदा कोणत्याही परिस्थितीमध्ये दीपकआबांच्या पाठीशी सांगोला तालुक्यातील देशभर पसरलेले सर्व गलाई बांधव तन,मन आणि धनाने दीपक आबांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहतील असा विश्वास देखील यावेळी गलाई बांधवांनी व्यक्त केला.