इचलकरंजी मतदारसंघात झळकले…

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून यंदा आपण लढणार नाही असे आमदार प्रकाश अण्णांनी यापूर्वी स्पष्ट केले असून त्यांच्या ऐवजी डॉ. राहुल आवाडे लढतील अशी घोषणा देखील त्यांनी करून टाकली. तर पाच वर्षे महायुतीसोबत राहून योग्य सन्मान होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा ताराराणी पक्ष सहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत उतरणार असल्याचेही संकेत दिले.

महिन्याभरापूर्वी त्यांनी डॉ. राहुल आवाडे यांची इचलकरंजी मतदारसंघातून उमेदवारीही घोषित करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. विशेष करून डॉ. राहुल यांच्या उमेदवारीने आवाडे समर्थक, युवा कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागलेले आहेत. इचलकरंजीचा आमदार कोण होणार हे अजून जरी गुलदस्त्यात असलं तरी ताराराणी पक्षाचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची आमदारकी फिक्स आहे असा दावा आवाडे समर्थकांनी केलेला आहे.

रविवारी म्हणजेच 22 सप्टेंबरला डॉ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मतदारसंघातील गल्लीबोळात भावी आमदार असे होर्डिंग झळकले असून याची मतदारसंघात जोरदार चर्चा देखील रंगलेली आहे. डॉ. राहुल आवाडे म्हणजे आपल्या हक्काचा माणूस असे देखील काही ठिकाणी होर्डिंग पहावयास मिळाले. हातकणंगलेपासून पंचगंगा साखर कारखान्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा राहुल आवाडे यांना वाढदिवसाच्या तसेच आमदारकीच्या शुभेच्छा देणारे फलक झळकले आहेत. एकूणच डॉ. राहुल आवाडे यांना आमदार करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने तयारीला लागल्याचे यातून स्पष्ट होत आहे.