“पत्नीशी गद्दारी अन् पुण्याला जाऊन…”; कदमांचा गजानन किर्तीकरांवर हल्ला!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये गृहयुद्ध सुरु आहे. खासदार गजानन किर्तीकर आणि रामदास कदम यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. दोन्ही ज्येष्ठ नेते एकमेकांना गद्दार म्हणत आहेत. या ‘गृहयुद्ध’चे कारण म्हणजे मुंबईची उत्तर-पश्चिम लोकसभेची जागा. कीर्तिकर हे या जागेवरून विद्यमान खासदार आहेत, तर कदम या जागेवर आपल्या मुलासाठी फिल्डींग लावत आहेत. दरम्यान रामदास कदम यांनी गजानन किर्तीकरांवर वयैक्तिक हल्ला केला आहे.

रामदास कदम म्हणाले, एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये फटाके फुटत आहेत. हे शोभनीय नाही, गजानन किर्तीकर यांना मी विनंती केली होती. कालपर्यंत ते माझ्या खुर्चीवर बसून सांगत होते की माझ वय झालं आता मी निवडणूक लढवणार नाही. मात्र उद्धव ठाकरे गटाकडून आपल्या मुलाला लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर तुम्ही लगेच जवान कसे झालात? तुम्ही निवडणूक लढायला कसे तयार झालात? 

एकनाथ शिंदे यांच्याकडून तिकीट घ्यायचे आणि मुलाला निवडून आणायचे तर नाही ना?, असा प्रश्न रामदास कदम यांनी उपस्थित केला.

“गजानन किर्तीकर यांनी माझ्या विरोधात प्रेसनोट काढली. मला काहीतरी बोलून गेले. मात्र किर्तीकर यांना माझ्याविरोधात बोलण्याचा अधिकार नाही. मी कधीच गद्दारी केली नाही. उलट तुम्ही तुमच्या पत्नीशी गद्दारी केली अन् शेण खायला तुम्ही पुण्याला जाता. हे महाराष्ट्राला सांगू का? मला बोलायला लावू नका. ३३ वर्ष शाखाप्रमुख म्हणून मी काम केलं, त्या कामाच्या जोरावर गजानन किर्तीकर निवडून आले”, असे रामदास कदम म्हणाले.

“गजानन किर्तीकर आधी बोलतात नंतर मुख्यमंत्र्यांजवळ जातात. याआधी पण त्यांनी असं केलं आहे. मी त्यांची नस अन् नस ओळखतो. गजाभाऊ तुमच्या मुळावरती उठलो तर तुम्ही खरे काय आहात. मला तुमचे वस्त्रहरण करायला लावू नका. मला बोलायला लावू नका. नाहीतर महिला देखील तुम्हाला मत देणार नाहीत. चप्पलांनी मारतील. माझ्या नादाला लागून नका, तुमच्या रक्तात बेईमानी आहे”, असा आरोप रामदास कदम म्हणाले.