रेंदाळ ग्रामपंचायत प्रशासनाने यापूर्वी ३४ कोटी ५५ लाखांच्या योजनेसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. याकरीता लोकनियुक्त सरपंच सौ. सुप्रिया पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. लोकसंख्येचा निकष लावून वाढीव लोकवस्तीची विस्तारीत संख्या विचारात घेता संभाव्य लोकसंख्या फुगवून दाखवल्याने सदर प्रस्ताव शासन दरबारी बारगळला होता. यामध्ये कागदोपत्री ६ हजार १६ नोंद असलेल्या मिळकती आहेत. नोंद नसलेल्या साधारणता १ हजार मिळकतींचा यामध्ये विचार झाला नसल्याने सदर योजना रखडली मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने योजना मागे पडली.
शासनाने याबाबत फेरसर्वे करुन ४ कोटी ७७ लाख रुपयांची जनजीवन मिशन अंतर्गत पाणी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या पुरवठा योजनेला संमती देण्यासाठी सदर विशेष सभा बोलावली होती. यामध्ये यापूर्वी पेयजल योजना अंमलात आणली मात्र सांगितल्याप्रमाणे पाणी वितरण झाले काय ? असा प्रश्न उपस्थित करीत या योजनेची अंमलबजावणी केल्यास दोन दिवसाआड पाणी येणार याची हमी द्यावी व याप्रमाणे पाणी वितरण नाही झाल्यास संबंधित विभागावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी काही नागरिकांनी केली याला प्रतिसाद मिळाला नाही.
रेंदाळ गावाला मुबलक पाणी देणार या अजेंड्यावर निवडून आलेल्या सभागृहातील जलस्वराज्य ग्रामविकास आघाडीत पहिल्यांदाच उभी फूट पहायला मिळाली यावेळी काही सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या उपअभियंता सुरेश कुलकर्णी व जीई जितेंद्र वसगडेकर यांनी वितरणाचे काम ग्रामपंचायतीचे आहे, असे स्पष्टीकरण दिले. यावेळी गावकऱ्यांनी विविध मत मतांतरे व्यक्त केली. यातून शाब्दिक चकमक उडाली.
काही काळ तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली. उपसरपंच अभिषेक पाटील यांनी सदर योजनेत विविध उपांगाचा समावेश करण्यात यावा व किमान १५ वर्षे दोन दिवसाआड पाणी पुरवठा कसा होईल याचा विचार करावा याकरिता काय करायला हवे याबाबत विस्तृत माहिती देत संभाव्य परिस्थितीत पाणी टंचाई भासू नये म्हणून सदर योजना थांबवून नवीन वाढीव योजना नव्याने मंजूर करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
प्रशासकीय मान्यता मिळालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत ५ कोटींची योजना राबविण्यासाठी हातवर करून बहुमत अजमावून सभेत ठराव मंजूर करण्यात आला तर विस्तारीत पाणी योजनेसाठी सुध्दा नागरिकांनी हातवर केले. यामुळे संभ्रम वाढला. याबाबत संमती दर्शवलेल्या नागरिकांनी आपले नाव घालून सही करून सहमती द्यावी अशी मागणी अभिषेक पाटील यांनी केली. मात्र नागरिकांनी निघून जाण्यास सुरुवात केली.
रेंदाळ विशेष गाव सभेत जलजीवन मिशन अंतर्गत ४ कोटी ७७ लाखांच्या योजनेच्या अंतिम मंजुरीसाठी ठराव संमत करण्यावरून भर सभेत सत्ताधारी गटात जोरदार धुमश्चक्री पहायला मिळाली. उपसरपंच अभिषेक पाटील यांनी सदर योजना गावाला पूरक ठरत नसल्याने विरोध दर्शविला तर सभेत मंजूरी मिळाल्याने सरपंच सौ.सुप्रिया पाटील- इंगळे यांनी योजना बहुमताने मंजूर असल्याचे सांगितले आहे. पण मंजूर की नामंजूर याबाबत संभ्रम कायम असल्याने पुढे काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.