हातकणंगलेत हुतात्मा संकुलाची भूमिका गुलदस्त्यात!

हातकणंगले लोकसभा मतदार संघात इस्लामपूर विधानसभा मतदार संघात आमदार जयंत पाटील यांचा पारंपरिक विरोधक म्हणून हुतात्मा गट राजकारणात कार्यरत आहे. गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात गौरव नायकवडी यांनी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्विकारून निवडणूक लढवली होती. यामध्ये नायकवडी यांना ३५ हजार ६६८ मते मिळाली होती. नंतरच्या काळात ते शिवसेनेत कुठेच दिसले नसले, तरी हातकणंगले लोकसभा मतदार संघातही नायकवडी यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

गत लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून देण्यात हुतात्मा गौरव नायकवडी संकुल आणि धरणग्रस्तांचा मोठा वाटा आहे. गत विधानसभेला शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढविणारे हुतात्मा संकुलाचे नेते गौरव नायकवडी यांची भूमिका आजही गुलदस्त्यात आहे.

हुतात्मा संकुलांतर्गत वाळवा तालुक्यातील १५ गावे येतात. या गावांवर नायकवडी गटाचे वर्चस्व आहे. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ताकद नायकवडी यांच्या पाठीशी आहे. क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नायकवडी यांचा सामाजिक क्षेत्रातील वारसा गौरव नायकवडी यांनी जपल्याने धरणग्रस्तांचीही ताकद नायकवडी यांच्या पाठीशी आहे. गौरव नायकवडी यांनी मागील विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरेप्रणित शिवसेनेतून लढवली होती.

त्यानंतर, ते पक्षीय राजकारणातून अलिप्त होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही नायकवडी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदार संघात नायकवडी यांची भूमिका काय असणार? यावर समर्थकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.