अनेक भागातील सध्या अनेक समस्या , प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक विकासकामे देखील सध्या सुरु आहेत. हातकणंगले मतदार संघातही सध्या अनेक अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोरगरीब, कष्टकरी, श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक यांना केंद्रबिंदू मानून राज्य आणि केंद्र सरकारने खूप योजना आखल्या आहेत. त्या सर्व योजनांचा लाभ माझ्या विधानसभा मतदार संघातील जनतेला झाला पाहिजे आणि या मतदार संघातील विकास पाहण्यासाठी बाहेरुन लोक आले पाहिजेत.
हातकणंगले विधानसभा मतदार संघ एक नंबरचा झाला पाहिजे, असे काम करा, कर्तव्यात कसूर चालणार नाही. मिळालेल्या अधिकाराचा वापर करा, आपण सगळे जनतेसाठी आहोत, असे गृहित धरुन काम करुया, असे मत आमदार डॉ. अशोकराव माने यांनी सर्व खात्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत व्यक्त केले. यावेळी आम. डॉ. माने म्हणाले, ग्रामीण भागात रुग्णांना औषध पुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्राकडील बांधकामे, जागा मागणीचे विषय बांधकाम विभागाकडील प्रलंबीत व प्रस्तावित कामे, जलजीवन मिशनमधील कामे, अंगणवाडी संदर्भातील जागा मागणी आदी विषयासंदर्भातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख बजावावे.
आपल्याला हातकणंगले, मतदार संघात विकासकामांचा डोंगर उभा करायचा आहे. त्यासाठी राजकारणापलिकडे जाऊन काम करावे लागणार असून आता त्याची फक्त सुरुवात झाली आहे. अजून खूप कामे करायची आहेत. या कामांसाठी निधीची कमतरता कधीच भासू देणार नाही. सर्वांनी मिळून चांगले काम करुया. जे काही प्रलंबीत प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी शासन दरबारी मी प्रयत्न करणार आहे, अशी त्यांनी ग्वाही दिली.