खानापूर घाटमाथ्यावरील अनेक गावांसाठी वरदान ठरलेल्या सुलतानगादे साठवण तलावाच्या सांडव्यात व मुख्य भिंतीवर काटेरी झाडाझुडपांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला मोठा अडथळा निर्माण होत आहे. सुलतानगादे साठवण तलावाच्या सांडव्यात झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे तलावाच्या मुख्य भिंतीला धोका निर्माण झाला आहे.
सुलतानगादे तलावातील पाणी साठ्यावर खानापूर, बेनापूर, सुलतानगादे, करंजे व रामनगर परिसरातील पाणी योजना अवलंबून आहेत. या तलावामध्ये मोठा पाणी साठा झाल्यास या भागातील पाणीपातळीत वाढ होते. या तलावामुळे या परिसरातील प्राण्याचा प्रश्न सुटला आहे. यावर्षी कृष्णा नदीच्या पुराचे पाणी टेंभू योजनेच्या माध्यमातून या तलावात सोडले.
त्यानंतर खानापूर परिसरात झालेल्या पावसाने हा तलाव सध्या ओसंडून वाहू लागला आहे. मात्र पाटबंधारे विभागाने या तलावाच्या देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पाणी सांडव्यातून बाहेर पडताना या काटेरी झाडाझुडपांचा अडथळा निर्माण होत आहे. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देऊन ही झुडपे काढावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.