काल स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रथम स्मृतिदिनी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार टेंभू योजनेचे जनक स्व. अनिलभाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त गार्डी येथील पवई टेक येथील जीवनप्रबोधिनी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली.
अक्षरशः जनसागर लोटल्याचे दिसून आले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्यासह आजी-माजी मंत्री, आमदार, खासदारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वर्गीय अनिलभाऊंना आदरांजली वाहिली. खानापूर आटपाडीसह सांगली जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी देखील आपल्या लाडक्या नेत्याला पुष्पहार किंवा पुष्प वाहून प्रत्येकजण अभिवादन करत होते.
झरे गावातील ग्रामस्थांनी मात्र स्वर्गीय अनिलभाऊंना अत्यंत अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. शेतकरी दादा भानुसे यांच्यासह आलेल्या शेतकऱ्यांनी टेंभूच्या पानावर पिकवलेली द्राक्ष अनिलभाऊंच्या प्रतिमेला वाहून त्यांना अभिवादन केले. अनिल भाऊ यांच्यामुळेच झरे भागाचा दुष्काळ संपला असे सांगत शेतकरी दादा भानुसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.