आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण? कोल्हापुरातील सर्व पदाधिकारी ‘मातोश्री’वर…..

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना ठाकरे गट मुंबईत असणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील आढावा घेणार आहे.यासाठी कोल्हापुरातील सर्व पदाधिकारी आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख,विधानसभा प्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचा आढावा घेणार आहेत.

27 सप्टेंबर रोजी म्हणजे आज १२ ते सायंकाळी ५ या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. यासाठी जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, यासह अन्य पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवले आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ठाकरे गटाचा एकही आमदार नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडे किती जागा घ्यायच्या या संदर्भात चर्चा होणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाने यापूर्वी कोल्हापूर उत्तर, कागल,राधानगरी, शाहूवाडी, करवीर या मतदारसंघावर दावा केला आहे. चंदगड मतदारसंघापासून याची सुरुवात होईल. त्यानंतर राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, उत्तर, शाहूवाडी, इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

आढावा घेतल्यानंतर निश्चित झालेल्या जागांवर उमेदवार कोण असावा? त्याची सर्वोतोपरी ताकद किती आहे? त्याला इतर कोणत्या नेत्यांचा पाठिंबा मिळू शकतो. महाविकास आघाडीतील इतर नेते मदत करतील का? या सर्व गोष्टींचा आढावा पक्षप्रमुख ठाकरे घेणार असल्याची माहिती आहे.