कोल्हापूर, सांगलीला महापुराची कल्पना आधीच मिळणार..

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही यासाठी मित्राच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रातील निती आयोगाप्रमाणे राज्या मित्रा काम करते.
या प्रकल्पाला निधी देण्यासाठी जागतिक बँकेकडून परवानगी देण्यात आली आहे. साधारण ४ हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च येणार असल्याची माहिती मित्राचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. 13 तारखेला मित्राचे सीईओ प्रवीण परदेशी, मुख्यमंत्री, राजेश क्षीरसागर आणि वर्ल्ड बँकेचे अधिकारी यांच्यात बैठक होणार आहे.

मित्राच्या या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पूर नियंत्रणाची कामे, उड्डाणपूल बांधणे, भूस्खलन उपाययोजना, वीजवाहक तारा स्थलांतरीत करणे, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसास्थळे संरक्षित करणे, पुराची पूर्वकल्पना देणे, आपत्ती व्यवस्थापन उपकरणे खरेदी करणे, पूरसंरक्षक उपाययोजना आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी ४ हजार कोटी निधी मंजूर झाला आहे.
दुसऱ्या टप्प्यात महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासंदर्भात १३ फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक होणार आहे. शहर आणि जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या महापूर नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेची समिती 14 व 15 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात समितीकडून पूरग्रस्त भागाच्या पाहणीसह महापूर नियंत्रणाबाबतच्या विविध बैठका होणार आहेत.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (एमआरडीपी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे.