भाजपनं चार पैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यामुळं आता अपेक्षेप्रमाणं 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातील चर्चांना सुरुवात झाली आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षांतील स्थिती पाहता देशातील चार महत्त्वांच्या राज्यातील या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार याचीही उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
गेल्या काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्रानं उत्तरेतील राज्यांसारखाच कल दाखवला आहे. पण राजकारणचं काय तर आता महाराष्ट्राचा स्वभावही उत्तरेसारखा होत चालल्याचं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी मांडलं आहे.
या संपूर्ण निकालाबाबत बीबीसी मराठीनं सुहास पळशीकर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस, इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि राज्यातील महायुती याबाबतही महत्त्वाची मतं मांडली.
महाराष्ट्राचा स्वभाव बदलतोय?
या निकालांचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम याबाबत बोलताना सुहास पळशीकर यांनी महत्त्वाच्या मुद्द्याकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र्राच्या राजकारणाचा विचार करता, गेल्या काही निवडणुकांमध्ये उत्तरेच्या राजकारणासारखाच कल महाराष्ट्रात दिसला. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वीसारखं वेगळेपण राहिलेलं दिसत नाही. पण आता महारष्ट्राचा स्वभावच उत्तरेसारखा बनतोय आणि आपण दक्षिणेपासून बाजुला होतोय, याची चिंता वाटत असल्याचं ते म्हणाले.