कोल्हापूर, हातकणंगलेतून शरद पवार हुकमी एक्के काढणार बाहेर; ‘या’ नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा, शेट्टींच्या अडचणी वाढणार

लोकसभेचे कोल्हापूर व हातकणंगले (Kolhapur and Hatkanangle) मतदारसंघ राष्ट्रवादीचे पारंपरिक आहेत.

हातकणंगलेतील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर : ‘लोकसभेचे कोल्हापूर व हातकणंगले (Kolhapur and Hatkanangle) मतदारसंघ राष्ट्रवादीचे पारंपरिक आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार द्या,’ अशी मागणी काल (बुधवार) शरद पवार गटाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील बैठकीत केली.

कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, तर हातकणंगलेतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांना मात्र जागा सोडू येऊ नये, अशी जोरकस सूचनाही करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, आमदार बाळासाहेब पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी उपस्थित होते.

यावेळी आघाडीमध्ये तीन पक्ष असले तरी राष्ट्रवादीचे हे दोन्ही मतदारसंघ पारंपरिक आहेत. वातावरण चांगले असून, दोन्ही जागा मागा, आपले उमेदवार नक्कीच निवडून येतील, उमेदवार नाहीत, असे अजिबात नाही. जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या नावाला एकमताने पसंती दर्शवली.

बैठकीस आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार राजीव आवळे, नितीन जांभळे, मदन कारंडे, पद्मा तिवले, सुनील देसाई, अनिल घाटगे, अश्‍विनी माने, रोहित पाटील, नितीन पाटील, अमर चव्हाण, श्रीकांत पाटील, प्रकाश पाटील, शिवानंद माळी, शिवाजी सावंत, मुकुंद देसाई, विक्रमसिंह जगदाळे आदी उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने हातकणंगले मतदारसंघ माजी खासदार शेट्टी यांना सोडू नये. त्यापेक्षा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी झाली.

या मागणीमुळे हातकणंगलेतील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. बैठकीतील या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना या दोन्ही जागा हव्या आहेत, हे स्पष्ट झाले.

आम्ही निवडून आणायचे आणि…

हातकणंगले मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा होताना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार द्या, अशी मागणी केली. माजी खासदार राजू शेट्टी यांना मात्र जागा सोडू नये, असे जोरदार मत मांडले.

आपण मदत करून निवडून आणायचे व नंतर दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा, हा प्रकार नको. त्याऐवजी आपलाच उमेदवार द्या, निवडून येईल. आपणच लढूया, असे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, स्वाभिमानी संघटनेचा महाविकास आघाडीतील समावेश अजून ठरलेला नाही.