विद्यार्थ्यांची 17 ते 26 ऑक्टोबरपर्यंत प्रथम सत्र परीक्षा! यंदा शाळांना ‘एवढ्या’ दिवस दिवाळी सुट्टी

विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होणार असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या पहिल्या सत्र परीक्षेला कोणताही अडथळा नाही. दिवाळी सुटीपूर्वी विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा पार पडणार असून १७ ते २६ ऑक्टोबर या काळात ही परीक्षा घेतली जाणार आहे.

मुख्याध्यापक संघाने परीक्षेचे वेळापत्रक सर्व शाळांना यापूर्वीच कळविले असून त्यानुसार शाळांची तयारी पूर्ण झाली आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून झाली आहे.

शैक्षणिक वर्षातील चार महिने संपल्यानंतर विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षा पार पडणार आहे. मुख्याध्यापक संघाशी संलग्नित शाळांना (सभासद असलेल्या शाळा) मुख्याध्यापक संघातर्फे प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सातवीनंतर विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात घालण्याचा प्रकार थांबविला आहे.

त्यामुळे शाळांना आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणेच घ्यावी लागणार आहे. सर्व आस्थापनांच्या शाळांनी त्यादृष्टीने परीक्षेची तयारी केली असून परीक्षांचे वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या पालकांनाही पाठविले आहे. २६ ऑक्टोबरला ही सत्र परीक्षा संपणार असून दुसऱ्या दिवशी रविवारी आहे. त्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटी लागेल.