हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीख अन् मुहूर्त झाला निश्चित! जयंत पाटलांनी दिली माहिती, शरद पवारही असणार उपस्थित

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेले माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी अखेर भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय काल घेतला आहे. इंदापूरमध्ये काल त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी याबाबतची चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा केली. यावेळी हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) पत्रकार परिषदेत बोलताना आम्ही भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती दिली होती.

त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांच्या (Harshvardhan Patil) पक्षप्रवेशाची तारीख आणि मुहूर्त जाहीर केला आहे. जयंत पाटील यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश इंदापूर येथे सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी स. १० वाजता होणार आहे, याची माहिती जयंत पाटलांनी त्यांच्या सोशल मिडियावर पोस्ट करत दिली आहे.

जयंत पाटलांची पोस्ट काय?

राज्याचे माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी स. १० वा. त्यांचा पक्ष प्रवेश होईल.