दहावीनंतर करिअरच्या संधी…..

दहावी बारावीच्या परीक्षामधून सर्वच विद्यार्थ्यांची सुटका नुकतीच झाली आहे. मात्र दहावीनंतर पुढे काय करायचे? याची चर्चा मात्र प्रत्येक घरात हि होतच असते. हा प्रश्न विद्यार्थ्यां सोबत पालकांच्या मनात देखील डोकावत आहे.साधारण पाच दहा वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता.

दहावी नंतर विज्ञान, वाणिज्य, कला (आर्टस्, कॉमर्स, सायन्स) या तीन साईडपैकी एकामध्ये ऍडमिशन घ्या, बारावी करा आणि पुढे त्यातच ग्रॅज्युएशन करा किंवा मग D.ED, B.ED, Pharmacy वगैरे काही मर्यादीत पर्याय समोर असायचे ज्यात पुढे करियर करता येत होतं. जे गर्भश्रीमंत आहेत त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे दरवाजे उघडे होते.

त्यावेळी करिअरच्या संधीबद्दल आतासारखी जागरूकता नव्हती त्यामुळे हे मर्यादित पर्याय सोडून काही वेगळं करता येऊ शकतं हा विचारच अस्तित्वात नव्हता. पण आता दहावीनंतर सुद्धा करिअरच्या इतक्या अफाट संधी उपलब्ध आहेत की आपल्याला ज्यात रस आहे, आवड आहे असे क्षेत्र देखील कमाईचे उत्तम साधन होऊ शकतात. दहावीनंतर आपली आवड, आपली क्षमता, आपली जिद्द, आपले ज्ञान या जोरावर चांगले क्षेत्र निवडता येऊ शकते. सगळ्या संधींचा नीट अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतल्यास भविष्य सुकर होईल व प्रगतीचे मार्ग मिळत जातील.

दहावीनंतर करिअरच्या संधी :-

१) आयटीआय (ITI) अभ्यासक्रम

ज्यांना वाणिज्य, कला, विज्ञान शाखेत रस नसेल किंवा आर्थिक परिस्थिती बेताची असेल, शिक्षणानंतर लगेच रोजगार हवा असेल तर आयटीआय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही प्रशिक्षण संस्था आहे जिथे विविध तांत्रिक विषयांवर विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. कमी कालावधीत तांत्रिक शिक्षण घेऊन येथील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यात विविध ट्रेंड उपलब्ध असतात जसे की-

  • टर्नर
  • इलेक्ट्रिशियन
  • मेकॅनिक
  • वेल्डर
  • प्लंबर

स्वतःच्या आवडीप्रमाणे विद्यार्थी वरीलपैकी कोर्स निवडून प्रशिक्षण घेऊ शकतात. आयटीआय नंतर पुढील ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात-

  • खाजगी कंपनी
  • बँकिंग क्षेत्र
  • सार्वजनिक क्षेत्र, पीडब्ल्यूडी इत्यादी
  • स्वयंरोजगार
  • परदेशात नोकरी किंवा कोर्सप्रमाणे पुढील शिक्षण देखील घेता येते.
२) पॉलिटेक्निक अभ्यासक्रम

दहावीनंतर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असल्यास पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. यात देखील अनेक डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध असतात.

  • आयटी इंजिनिअरिंग
  • कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंग
  • मेकॅनिकल इंजीनिअरिंग
  • टेक्सटाइल इंजीनिअरिंग
  • इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
  • सिविल इंजिनीअरिंग
  • आयसी इंजिनीअरिंग
  • ईसी इंजिनीअरिंग
  • माइनिंग इंजिनीअरिंग

डिप्लोमा करून इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकतो किंवा डिप्लोमा नंतर नोकरीच्या अनेक संधी देखील उपलब्ध असतात.खाजगी कंपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळू शकते. स्वतःचा बिझनेस देखील सुरू करता येऊ शकतो. स्वतःवर विश्वास असण्याची गरज आहे.

फाईन आर्टस्/ परफॉर्मिंग आर्टस्

अनेक विद्यार्थी शालेय जीवनापासूनच कलाप्रेमी असतात. चित्रकला, कार्यानुभव असे विषय त्यांच्या अगदी आवडीचे असतात. इतर विषयांशी त्यांचं सूत फारसं जुळत नाही व दहावी/ बारावीनंतर जबरदस्ती इतर विषयात मन रमवायचा प्रयत्न जरी केला तरी मनासारखं करियर घडत नाही. म्हणून ज्यांना आर्टस्, क्राफ्ट मध्ये प्रचंड आवड आहे त्यांनी आर्टस् अँड क्राफ्टस, डान्स, सिरॅमिक अँड पॉटरी, ड्रॉईंग,इंटिरिअर डिझाइन,स्कल्प्चर आर्ट, म्युजिक, ग्राफिक डिझाइन, ऍनिमेशन इत्यादी सारख्या क्षेत्राचा करियर म्हणून विचार करावा. यात दहावीनंतर कोर्स उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करून योग्य ते करियर निवडावे व प्रगती करावी.

आयुष्यातील एक चुकीचा निर्णय पुढील सगळे भविष्य तडजोडीच्या मार्गावर नेते म्हणून दहावी/ बारावी या महत्वाच्या वर्षानंतर वेळ घेऊन, शांतपणे विचार करून, आपल्यातील क्षमतेला ओळखून, सुप्त गुण जाणून करियरचा महत्वपूर्ण निर्णय घ्यावा. आताच्या काळात अनेकानेक संधी करियरचे दरवाजे बनून खुले झाले आहेत त्यांचा नीट अभ्यास करून निर्णय घेणे आवश्यक आहे. हे कोर्सेस करून स्वतःचा उद्योग सुरू करून उद्योजक देखील होता येते.