आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या असतानाच खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय खलबत्ते सुरू झालेली आहेत. महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने खानापूर विधानसभेच्या रणांगणामध्ये महायुतीच्याच तिन्ही पक्षांमध्ये लढत होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र चार दिवसापूर्वी आटपाडी तालुक्यातील भाजपचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्याने आता महाविकास आघाडीचे पारडे जड झालेले आहे. त्यांनी उमेदवारीचा दावा केला आहे.
महायुतीकडून शिंदे सेनेकडून सुहासभैया बाबर यांना तिकीट निश्चित मानले जात आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनीही निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतलेली आहे. वैभव पाटील यांनीही निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले असून महायुतीकडूनच प्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीला इच्छुक असल्याचे सांगितलेले आहे. चार दिवसापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने मतदारसंघात खळबळ माजलेली होती. यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेशाबाबत कोणतेच भाष्य केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे असे असले तरी सर्वच इच्छुक सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत.