आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षात प्रत्येक मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे.पुण्यात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केवळ एकच प्रश्न विचारत इच्छुक उमेदवारांची फिरकी घेतली.कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील जे उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि तुतारी फुंकण्यावर ठाम आहेत अशा उमेदवारांची शरद पवार यांनी पुणे येथे मुलाखती घेतल्या.यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी इच्छुक उमेदवारांना केवळ एकाच प्रश्नावर फिरकी घेत आपण निवडून कसे येणार? याचे रणनीती स्पष्ट करावी, असे विचारले.
कोल्हापूर उत्तर मधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हि बी पाटील, राधानगरी मधून ए वाय पाटील, संतोष मेघाने, चंदगड विधानसभा मतदारसंघातून अमरसिंह चव्हाण नंदाताई बाभुळकर, ‘कागल’मधून समरजितसिंह घाटगे, ‘इचलकरंजी’मधून माजी आमदार अशोकराव जांभळे, मदन कारंडे आणि ‘शिरोळमधून स्नेहा देसाई यांनी मुलाखती दिल्या.
कोल्हापूर उत्तर, चंदगड, राधानगरी-भुदरगड, कागल, इचलकरंजी व शिरोळ विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दावा केला आहे. यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक चौघांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ राधानगरीतून तिघांनी उमेदवारीची मागणी केली आहे.