भारताने श्रीलंकेवर मोठा विजय साकारला आणि सेमी फायनलचे दार उघडले आहे. भारताने तुफानी फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर अचूक गोलंदाजी करत श्रीलंकेला फक्त ९० धावांत ऑल आऊट केले. त्यामुळे या मोठ्या विजयामुळे भारतासाठी उपांत्य फेरीचे दार खुले झाले आहे. भारताने या सामन्यात तब्बल ८२ धावांनी मोठा विजय साकारला. या विजयासह भारताने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे आणि त्यांनी सेमी फायनलचे दार उघडले आहे.
भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली ती सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी. या दोघींनी श्रीलंकेच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला आणि भारताला दमदार सलामी दिली. या दोघीही अर्धशतकासमीप आल्या होत्या आणि भारतीय संघ शतकाच्या उंबरठ्यावर होता. पण त्याचवेळी भारताला पहिला धक्का बसला.
स्मृती मानधना यावेळी ५० धावांवर असताना बाद झाली. स्मृतीने यावेळी ३८ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. स्मृती बाद झाल्यावर काही वेळात शेफालीही बाद झाली, पण तिला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. शेफाला यावेळी ४३ धावा करता आल्या.स्मृती आणि शेफाली फक्त आठ धावांच्या फरकाने बाद झाल्या होत्या. भारतासाठी ही नाजूक वेळ होती. पण भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने यावेळी तुफानी फटकेबाजी केली आणि भारताची धावगती चांगलीच वाढवली.
हरमनप्रीत कौरने यावेळी फक्त २७ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५२ धावांची खेळी साकारली. तिच्या या खेळीच्या जोरावर भारताला प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा करता आल्या.श्रीलंकेचा संघ यावेळी १७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला खरा, पण त्यांना दुसऱ्याच चेंडूपासून धक्के बसायला सुरुवात झाली. श्रीलंकेच्या आठ फलंदाजांना यावेळी दोन अंकी धावसंख्याही उभारता आल्या नाहीत. भारताने अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळे श्रीलंकेचा संघ हा फक्त ९० धावा करू शकला. भारताकडून अरुंधती आणि आशा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.