पेठवडगावात क्रीडा संकुलसाठी लढा उभारण्याचा निर्णय!

पेठवडगाव येथे क्रीडा संकुल व्हावे यासाठी गेली सहा महिने अभियान राबविण्यात येत आहे. पेठवडगाव परिसरात विविध क्रीडा प्रकारात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखवून यश मिळविणारे अनेक खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या गावापासून दूर जात सराव करून जिद्दीने यश आणलेले आहे. मात्र अशी सुविधा मिळविण्यासाठीचा खर्च प्रत्येक खेळाडूला परवडणारा नाही. यासाठी पेठवडगाव येथे क्रीडा संकुल होणे अतिशय गरजेचे आहे.

पेठवडगाव व परिसरातील खेळाडूंना खेळण्यासाठी क्रीडा संकुल नसल्याने खेळाडूंचे खूप नुकसान होत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी पेठवडगावसारख्या मध्य ठिकाणी सर्व सोयीनुक्त क्रीडा संकुल गरजेचे आहे. आज शिक्षणाबरोबर खेळाडू तयार होण्याची गरज आहे. पेठवडगाव येथे क्रीडा संकुल होण्यासाठी लढा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वडगाव परिसरातील ३० गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.