टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, कांगारुंना लोळवणार?

भारतीय महिला क्रिकेट टीम टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत साखळी फेरीतील आपला चौथा आणि अखेरचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचा हा चौथा सामना आहे. ऑस्ट्रेलियाने 3 पैकी 3 सामन्यात विजय मिळवलाय. तर टीम इंडियाला 3 पैकी 2 सामन्यात यश आलं. तर एकदा पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने सलग 3 विजयासह सेमी फायनलचं तिकीट जवळपास निश्चित केलं आहे. मात्र टीम इंडियाला उपांत्य फेरीतील आव्हान कायम ठेवायचं असेल, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवाला लागणार आहे.

उभयसंघातील सामन्याला आज 13 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. शारजाहची खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक असल्याने इथे धावांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला या मैदानात फायदा होऊ शकतो. तसेच फिरकी गोलंदाजासाठी पोषक आहे. टीम इंडियाने पराभवाने सुरुवात केल्यानंतर सलग 2 सामने जिंकले आहेत. अशात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत विजयी हॅटट्रिक साधण्याकडे टीम इंडियाचं लक्ष असणार आहे.

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 36 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. या 36 पैकी सर्वाधिक सामन्यात ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. कांगारुंनी भारतावर 25 सामन्यात विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला फक्त 8 वेळात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत नववा विजय मिळवावा, अशी प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याची असणार आहे.