इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 (Indian Premier League) चा नवा सीझन सुरू होण्यासाठी फारसा वेळ उरलेला नाही. आयपीएल 2024-22 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या आगामी सीझनची सुरुवात चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघांमधील धमाकेदार सामन्यानं होणार आहे. अवघ्या काही दिवसांतच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यंदाच्या सीझनचा आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र त्यापूर्वीच चेन्नईला जबरदस्त धक्का बसला आहे.
चेन्नईचा (CSK) धमाकेदार फलंदाज आणि धोनीचा (MS Dhoni) हुकुमी एक्का डेव्हन कॉन्वे (Devon Conway) दुखापतग्रस्त झाल्यानं तब्बल दोन महिन्यांसाठी सामन्यातून बाहेर गेला आहे. चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे किमान आयपीएलच्या पूर्वार्धात खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडच्या या स्टार फलंदाजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही खेळताना दिसला नाही. अशातच संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानालाही दुखापत झाली आहे. चेन्नईला कॉन्वेच्या रुपात बसलेला हा दुसरा धक्का आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळणार की नाही? याबाबत शंका आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना डाव्या पायात ‘ग्रेड वन हॅमस्ट्रिंग’च्या समस्येनं त्रस्त आहे. श्रीलंकेच्या या गोलंदाजाला 6 मार्च रोजी बांगलादेश विरुद्ध सिल्हेत येथे झालेल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ही दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आपला स्पेल देखील पूर्ण करू शकला नाही आणि मैदानाबाहेर गेला. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामनाही पाथिराना खेळू शकला नाही. पाथिराना दुखापतीतून कधीपर्यंत बरा होणार? याबाबत मात्र अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही. तो कधीपर्यंत तंदुरुस्त होईल, याबाबत श्रीलंका क्रिकेटनंही कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाही
चेन्नई सुपर किंग्जच्या शेवटच्या आयपीएल विजेतेपदात पाथिरानानं 12 सामन्यात 19 विकेट्स मिळवण्यात मोठी भूमिका बजावली होती. धोनी पाथिरानाला मोक्याच्या शेवटच्या काही ओव्हर्समध्ये वापरतो. धोनीच्या विश्वासावर खरा उतरत पाथिराना भल्या भल्या फलंदाजांना माघारी धाडतो.