आनंद दिघे असते तर शिंदेला गोळ्या घातल्याच असत्या; उद्धव ठाकरे

बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणी पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. आनंद दिघे असते तर शिंदेला गोळी घातलीच असती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी बदलापूर एन्काऊंटवर भाष्य केले. “आनंद दिघे असते तर शिंदेला गोळ्या घातल्याच असत्या. असे महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचे नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“आनंद दिघे असते तर शिंदेला गोळ्या घातल्याच असत्या”

“ठाणे जिल्ह्यात शिंदेला गोळी घातली. शिंदेला गोळ्या घालायला पाहिजे होत्या. त्याचा गुन्हाच तसा होता. आनंद दिघे असते तर शिंदेला गोळी घातलीच असती. हा नराधम महिलांवर अत्याचार करतो, महिलांची अब्रू लुटतो, त्याला गोळी घातली बरं झालं. शिंदेला मारायलाच पाहिजे होता. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो. पण तरीही एक प्रश्न आहे. शिंदेला गोळी घातली कारण बाकीच्यांना वाचवायचे असेल. असं असलं तरी शिंदेला गोळ्या घातल्याच पाहिजे. आनंद दिघे असते तर शिंदेला गोळ्या घातल्याच असत्या. असे महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचे नाही”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.