मुंबई सेंट्रल येथे एसटीच्या चालक-वाहकांसाठी एसी विश्रांतीगृह, राज्यातील पहिला प्रकल्प

एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकांसाठीच्या विश्रांतीगृहांच्या दयनीय अवस्थेबाबत नेहमीच बातम्या अधूनमधून येत असतात. परंतू आता राज्यातील एसटी वाहक आणि चालकांना आरामदायी वातानुकूलित विश्रांतीगृहाची सोय करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील राज्यातील पहिल्या वातानुकुलीत चालक-वाहक विश्रांतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मुंबईचे पालकमंत्री तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल या मध्यवर्ती कार्यालयात राज्यातील पहिले वातानुकूलित विश्रांती गृह निर्माण करण्यात आले आहे. या एसटीच्या कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना येथे विश्रांती करता यणार आहे. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून हे विश्रांतीगृह बांधण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीद्वारे हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. अशाच प्रकारचे वातानुकूलित विश्रांती कक्ष परळ, कुर्ला नेहरूनगर , बोरीवली नॅन्सी कॉलनी येथील आगारात तयार करण्यात येणार आहेत. ठाण्यातील खोपट बस स्थानकात राज्यातील दुसरे वातानुकूलित कक्ष बांधून तयार झाले आहे. त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे.

राज्यातील वेगवेगळ्या एसटी बस आगारातून बसेस घेऊन येणाऱ्या सुमारे तीनशे चालक- वाहकांसाठी तसेच मुंबई आगारातील 100 चालक – वाहकांच्यासाठी सुमारे 90 लाख रुपये खर्चून वातानुकुलीत असे 3 अत्याधुनिक विश्रांती कक्ष बांधण्यात आले आहेत. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या विश्रांती कक्षांमध्ये टू टिअर बॅक बेड सह, करमणूक कक्ष, जेवणासाठी स्वतंत्र हॉल , स्वच्छ आणि टापटीप असे प्रसाधनगृहे निर्माण करण्यात आले आहे.