Cancer Vaccine: 9-16 वर्षांच्या मुलींना देणार कॅन्सरची लस; कधीपासून सुरु होणार लसीकरण? सरकारची माहिती

बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचं प्रमाण वाढलं आहे. यातील एक आजार म्हणजे कॅन्सर. गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सर रूग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ‘कॅन्सर’ हा असा शब्द आहे ज्याचे नाव ऐकताच लोकांच्या पायाखालची जमीन सरकते.दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा या आजाराने बळी जातो. भारतात या दुर्धर आजाराची आकडेवारी कमी नाहीये. देशात कॅन्सरच्या वाढत्या घटना लक्षात घेता, केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचललंय.

महिलांमध्ये कॅन्सर रोखण्यासाठी लवकरच एक विशेष लस उपलब्ध होणार आहे. केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही लस पुढील पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार आहे. ही लस ९ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींना देण्यात येणार आहे.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मते, ही लस महिलांमध्ये होणाऱ्या सर्वात सामान्य प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण देणार आहे. ब्रेस्ट कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कॅन्सर यांचा त्यामध्ये समावेश आहे.

जाधव यांच्या सांगण्यानुसार, या लसीवरील संशोधन जवळजवळ पूर्ण झालं असून त्याच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत.मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं की, भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या सतत वाढतेय. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. ३० वर्षांनंतर महिलांसाठी आवश्यक कॅन्सर तपासणीची व्यवस्था केली जाणार आहे. हा आजार वेळेत ओळखता येणार आहे. आणि योग्य उपचार करता येणार आहेत.

याशिवाय, सरकार डे-केअर कॅन्सर केंद्र स्थापन करण्याची योजना आखतंय. जेणेकरून कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करता येऊन उपचार सुरू करता येतील.जर सर्व काही व्यवस्थित राहिल्यास तर ही लस पुढील ५-६ महिन्यांत उपलब्ध होणार आहे. यानंतर, ही लस ९ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाईल, जेणेकरून भविष्यात कॅन्सरपासून महिला सुरक्षित राहू शकतील.