आतातरी सलमान खानने माफी मागावी; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर भाजप नेत्याची मागणी

माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर एकच घबराट पसरली आहे. सलमान खानशी जवळीक असल्याने बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. बिश्नोई गँगकडून शेअर करण्यात आलेल्या फेसबुक पोस्टमध्ये देखील त्याचा उल्लेख होता. त्यानंतर आता सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी केली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. हरनाथ सिंह हे भाजपकडून राज्यसभेवर खासदार होते. त्यांनी ही मागणी केली आहे.प्रिय सलमान खान, काळवीटाला देव मानतात, त्याची पूजा करतात. तू त्याची शिकार केलीस. इतकंच नव्हे तर तू ते शिजवून खाललंस. यामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. बऱ्याच काळापासून तुझ्यावर बिश्नोई समाजाचा रोष आहे.

माणसाकडून चुका होतात. तू मोठा अभिनेता आहे. देशातील अनेक लोक तुला मानतात. तुझ्यावर प्रेम करतात. माझी तुला विनंती आहे की बिश्नोई समाजाच्या भावनांचा तू आदर करावा. तुझ्याकडून झालेल्या चुकीसाठी तू बिश्नोई समाजाची माफी मागावी.बाबा सिद्दिकी आणि सलमान खान यांची मैत्री सर्वश्रृत आहे. बाबा सिद्दिकी आणि सलमान खान हे अनेकदा एकत्र दिसायचे. खान आणि सिद्दिकी कुटुंबाची जवळीक होती. याचमुळे बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांना टार्गेट केलं.

बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारत एक पोस्ट शेअर केली. यात दाऊद इब्राहिम आणि सलमान खान यांच्याशी बाबा सिद्दिकी यांची जवळीक आहे. सिद्दिकी सलमान आणि दाऊदला मदत करत होते. जो कुणी सलमान आणि दाऊदला मदत करणार त्याचा असाच गेम होणार, असं या बिश्नोई गँगच्या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. त्यानंतर आता भाजप नेत्याने सलमानला माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.