उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु! शिवसेना ठाकरे-शिंदे गटात जुंपणार, केंद्रस्थानी मुंबई महापालिका

उद्यापासून नागरपूरमध्ये राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. ऐन हिवाळ्यात अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण सरकारला घेरण्यासाठी विरोधीपक्षांना जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून या आरोपांना देखील जशासतशी उत्तरे दिली जाण्याची शक्यता आहे.हिवाळी अधिवेशनात मुंबई महापालिकेवरुन शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जुंपण्याची शक्यता आहे. नुकतेच उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि कंत्राटदारावरून एकनाथ शिंदेवर टीका केली होती. यावरुन शिंदे गटाकडूनही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. 

ठाकरे गटाची रणनिती

ठाकरे गट हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोट ठेवण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील शेतकरी गारपीट आणि अवकाळीमुळे अडचणीत सापडला आहे. या मुद्द्यावरुन देखील ठाकरे गट सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. ललित पाटील प्रकरण देखील हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाकडून देखील हिवाळी अधिवेशनात कोविड घोटाळे, रस्ते घोटाळे, नाले सफाई घोटाळे आणि खिचडी घोटाळ्यांवरून ठाकरे गटाला लक्ष केले जाऊ शकते. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते विविध घोटाळ्याच्या चौकशीत अडकलेले आहेत.

यावरून ठाकरे गट देखील आक्रमक झाला असून हिवाळी अधिवेशन मुंबईच्या मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढतात की सत्ताधारी ठाकरे गटाला धारेवर धरतात हे उद्यापासून स्पष्ट होईल.