‘या’ हुकुमी एक्क्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी! पटोलेंचे वक्तव्य

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तयारीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत लावण्यात आलेल्या पोस्टरवर विधान परिषदेचे गटनेते असूनही आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांचा फोटो नव्हता.यावरून कोल्हापुरातून या बैठकीला गेलेल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना धारेवर धरले. यावर नेत्यांनी सावरासावर करून त्यावर पडदा टाकला.

दरम्यान, ‘कोल्हापूरसह सांगली व सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे (Congress) घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी म्हणून तसा दावा करू, पण ऐनवेळी कुठल्याही पक्षाला उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विजयासाठी सहकार्य करा’, असे आवाहन पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी केरळचे आमदार रमेश चेन्नीथल्ला यांनी केले.

लोकसभेच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसकडून विभागनिहाय मेळावे आयोजित केले आहेत. आज पश्‍चिम महाराष्ट्राचा मेळावा होता. त्यासाठी कोल्हापुरातून आमदार प्रा. जयंत आसगांवकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, राजू आवळे यांच्यासह शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शशांक बावचकर, तौफिक मुल्लाणी सूर्यकांत पाटील, संजय पोवार उपस्थित होते.

काँग्रेस कोल्हापूरसह सांगली, सोलापूर मतदारसंघांसाठी आग्रही आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली तर आमदार सतेज पाटील यांनाच उमेदवारी देऊ असे पटोले म्हणाले. ‘त्यावर तुम्ही कोल्हापुरातून लढला तरी आम्ही तुम्हाला विजयी करू’, असे आश्‍वासन सचिन चव्हाण यांनी दिले.