मिचौंग चक्रीवादळाचा धोका वाढला; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा! अलर्ट जारी

सतत वातावरणात फरक होत राहिल्याने सर्व लोक खूपच हतबल झालेले आपणाला पहायला मिळत आहेत. सतत वातावरणातील होत असलेल्या फरकामुळे शेतकर्यांना खूपच नुकसान सहन कराव लागत आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार झाल्याने तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक इमारती पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, मिचौंगचा धोका आणखीच वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत मिचौंग चक्रीवादळ आणखी उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. परिणामी महाराष्ट्रासह १७ राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढलेली पिके झाकून ठेवावीत असा, सल्लाही देण्यात आला आहे.

मिचौंग चक्रीवादळाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा या तीन राज्यांना चांगलाच तडाखा दिला आहे. मंगळवारी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे  (Rain Alert) चेन्नईत पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

मिचौंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झारखंडमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारीपट्टी भागातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटांवरही धुव्वाधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अन्य ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.