मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, तर पक्षही ठरला!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे, तर २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच एक अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या आणि अनेक दिवस चर्चेत असलेल्या अधिकाऱ्याची एंन्ट्री झाली आहे, IRS अधिकारी समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाच्या रिंगणात उतरणार आहेत. महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समीर वानखेडे मुंबईतील विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. आता हेच वानखेडे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून समीर वानखेडे निवडणूक लढवणार अशी शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वानखेडे निवडणूक रिंगणात उतरु शकतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत या संदर्भात त्यांची बोलणी पक्का झाल्याची माहिती आहे.

समीर वानखेडे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार असून हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे. त्यानंतर राजकारणातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा अशी तीन पक्षांची मिळून महायुती आहे.