इचलकरंजीत राजकीय घडामोडींना वेग!

महाविकास आघाडीकडून मदन कारंडे किंवा सुहास जांभळे आणि महायुतीकडून डॉ. राहुल आवाडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. या घडामोडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना तिसरा पर्याय म्हणून पसंती मिळू लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत रवींद्र माने यांना निवडणुकीत उतरावयाचेच या घडामोडींना वेग आला असून मुंबईतून यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस सोडणार नाही. अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्याची आजही आहे.

त्यातच मदन कारंडे किंवा सुहास जांभळे यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित मानली जात असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. तर महायुतीत ही यापेक्षा वेगळे चित्र दिसत नाही. डॉ. राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून त्यांची उमेदवारी निश्चित करून घेतल्याने हाळवणकर गोटात कमालीची अस्वस्थता आहे. यामुळे कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना इचलकरंजीत यावे लागले.तरीही कार्यकर्त्यांची नाराजी दूर झालेली दिसत नाही, असे दिसते. या एकूणच वातावरणात रवींद्र माने यांनी निवडणूक लढवावी असा नवा पर्याय पुढे आलेला आहे.

रवींद्र माने मैदानात उतरले तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही उमेदवारासोबत मोठी चुरस होऊ शकते. रवींद्र माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले जवळकीचे संबंध याचा वापर करून शहरासाठी निधी खेचून आणला. त्यामुळे शिवसेनेचा चेहरा म्हणून रवींद्र माने यांच्याकडे पाहिले जाते म्हणूनच तिसरा पर्याय म्हणून रविंद्र माने यांचे नाव पुढे येत आहे, असे झाल्यास तिरंगी लढतीत कुणाचा घात होणार आणि कुणाला लॉटरी लागणार हे पहावे लागेल.