इचलकरंजी मनपाचे 625 कोटींचे अंदाजपत्रक जाहीर..

इचलकरंजी येथील महापालिकेचे दुसरे अंदाजपत्रक जाहीर केले आहे. 2024-25 वर्षासाठी 625 कोटींचे कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेले 22 कोटींचे शिल्लकी अंदाजपत्रक आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी जाहीर केले.शासनाच्या अनुदानावर बजेटची दिशा असून, नव्या प्रकल्पासाठी कर्ज घेणार असल्याचे आयुक्तांनी सूचित केले.

मनपा अधिकाऱयांच्या बैठकीत आयुक्त दिवटे यांनी अंदाजपत्रक मांडले. विविध बाबींतून 625 कोटी 41 लाख 63 हजार इतके उत्पन्न पालिकेला मिळणार आहे. पाणीपट्टी व घरफाळा आकारणीचे दर कायम ठेवले असून, थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी सामान्य करात दहा टक्के सूट दिली जाणार आहे. मालमत्ताकरातून 46 कोटी अपेक्षित आहेत. कर वसुलीसाठी नेट बँकिंगचा वापर केला जाणार आहे.

विकास आराखडय़ातून 4 कोटी 21 लाख उत्पन्न अपेक्षित आहे. आरक्षित जागेवर विनागुंतवणूक विकास करण्यासाठी नियोजन केले आहे. यात मेडिकल सुविधा व शॉपिग सेंटर उभारले जाणार आहे. जीएसटीमधून अनुदान मिळण्यासाठी 353 कोटींचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. तसेच एक टक्के मुद्रांक शुल्क अनुदानासह थकीत स्थानिक संस्था करातून मिळणारे उत्पन्न गृहीत धरून या अंदाजपत्रकामध्ये तरतुदी केल्याचे दिवटे यांनी सांगितले.

पाणीपट्टीतून 9 कोटी 77 लाख, रस्ते-खोदाई फीमधून 5 कोटी 7 लाख, अग्निशमनमधून 30 लाख, स्थावर मालमत्ता करातून 3 कोटी 56 लाख अपेक्षित आहे. बाजार वसुली ठेका खासगी ठेकेदाराला दिला असून, यातून 1 कोटी 8 लाख रुपये मिळतील, शिवाय उत्पन्नाचे नवे स्रोत तयार केले आहेत. मनपाच्या सर्व विभागाकडून 209 कोटी 62 लाख महसुली उत्पन्न अपेक्षित आहे. केंद्र, राज्य आणि अन्य शासकीय विभागाकडून प्राप्त होणारे अनुदान 291 कोटी 13 लाख अपेक्षित आहे. तर 2023-24 या वर्षात भांडवली योजनांसाठी मनपाचा हिस्सा म्हणून कर्ज उभारणीची गरज लागू शकते, याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले.

आर्थिक वर्षात महसुली खर्च 282 कोटी तर भांडवली खर्च 32 कोटी 23 लाख प्रस्तावित आहे. रस्ते रुंदीकरण, मजबुतीकरण ही कामे जिल्हास्तर नगरोत्थानमधून चालू आहेत. आरोग्य विभागाअंतर्गत 6 नागरी व 3 आरोग्यवर्धिनी केंद्रे शासनाकडून हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. भटक्या कुत्र्यावर नसबंदी करण्यात येणार आहे. शहरात राज्यस्तर नगरोत्थानमधून सहा जलकुंभ बांधणीस मंजुरी मिळाली आहे. कृष्णानदी पाणी योजनेचे गळके पाईप बदलण्याचे काम चालू आहे. भुयारी गटार स्वच्छ करण्यासाठी मशीन उपलब्ध होणार आहे. इचलकरंजीत परिवहन सेवा सुरू केली जाणार असून, 25 इलेट्रिक बस मंजूर झाल्या आहेत.

मनपा कार्यालयात तसेच जलशुद्धीकरण आणि अन्यत्र सौरऊर्जेचा वापर केला जाईल, तसेच 10 हजार वृक्षलागवड संकल्प, बगीच्यात खेळणी, क्रीडा क्षेत्रास उत्तेजन देण्यास सुविधा, पर्यावरणपूरक म्हणून महिलांकडून कापडी पिशव्या निर्मिती, चौक सुशोभीकरण कार्यक्रम, नदी प्रदूषण मुक्ती, शिवतीर्थ विकसित करणे आदी कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी मुख्य लेखाधिकारी विकास खोलपे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, तैमूर मुलाणी, आढाव व इतर अधिकारी हजर होते.