इचलकरंजी शहरात आता लवकरच ई-बस धावताना दिसणार आहेत. त्यासाठी १२ मार्ग निश्चित केले आहेत. यामध्ये कमीत कमी १० ते जास्तीत जास्त ४२ किलोमीटरपर्यंतचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता परिसरातील गावांतून इचलकरंजीत ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. यासंदर्भातील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी गती येत असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. इचलकरंजी शहरासाठी पीएम ई-बस सेवा केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात.. आली आहे. या योजनेतून २५ ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी शहापूर परिसरातील सोलगे मळ्यात ३८ गुंठ्यांमध्ये स्थानक होणार आहे.
या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामालाही लवकरच गती मिळणार आहे. या सर्व कामांसाठी १२ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आता पायाभूत सुविधांची प्रतीक्षा लागली आहे. त्यासाठी आवश्यक कामांचा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे.
साधारणपणे पुढील तीन महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यानंतर ई-बस धावताना दिसणार आहे. विविध १२ मार्गांवर ई-बस धावणार आहे. यामध्ये दिवसभरात २१२ फेऱ्या होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. नृसिंहवाडीसाठी दोन वेगवेगळे मार्ग निश्चित केले आहेत. संबंधित कंपनी चालक देणार आहे, तर वाहकांची नियुक्ती महापालिका करणार आहे.