इचलकरंजी शहराचा पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीला मोठा हातभार, आणखी दोन प्रकल्प उभारणार

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात अनेक विकासकामे सुरु आहेत. त्याचबरोबर अनेक प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न देखील सुरु आहेत. सध्या पंचगंगा प्रदूषण हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. इचलकरंजी शहरातील मैलायुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडले जाते. असा आरोप विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातो. थेट नदीत सांडपाणी सोडल्याप्रकरणी बऱ्याच वेळेला महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तत्कालीन नगरपालिका व सध्याच्या महानगरपालिका प्रशासनाला नोटीसा व दंडाची कारवाई झाली आहे. शहरात सध्याचा कचरा डेपो परिसरात २० एम.एल.डी. क्षमतेचा एस.टी.पी. कार्यान्वित आहे.

टाकवडे वेस परिसरातील संप येथून मैलायुक्त सांडपाणी उचलून कचरा डेपो येथे असलेल्या एस. टी. पी. येथे प्रक्रिया केली जाते. शहराची वाढती लोकसंख्या पाहता आणि पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीच्या दृष्टीने येथील टाकवडे वेस परिसरात ९८ कोटी रुपये खर्च करून १८ एम.एल.डी. अत्याधुनिक सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले. सदरचा प्रकल्प पूर्ण होण्यास २ वर्षे ३ महिन्यांचा कालावधी लागला. सदर एस. टी. पी. प्रकल्पास ८०० ते ८५० केव्ही वीज लागणार असून त्या दृष्टीने वीज जोडणीचे कामकाज सुरू आहे. दोन-तीन आठवड्यामध्ये वीज जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर सदरचा प्लॅट सुरू होईल. प्लॅट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर शहरात निर्माण होणाच्या १८ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे शक्य होईल.

तसेच पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीला इचलकरंजी शहराचा मोठा हातभार लागेल. इचलकरंजी येथील टाकवडे वेस परिसरात अत्याधुनिक पध्दतीने १८ एमएलडी क्षमतेचा एस.टी.पी. (सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र) प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पास वीज जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर प्रकल्प कार्यान्वित होतील. सदर प्रकल्पासाठी तब्बल ९८ कोटी रुपये खर्च करणेत आला आहे. सदरचा एस.टी. पी. कार्यान्वित झाल्यास पंचगंगा प्रदुषण मुक्तीला मोठा हातभार लागणार आहे.

सध्या शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर कचरा डेपो परिसरातील २० एमएलडी प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते. सध्या टाकवडे वेस येथे १८ एमएलडीचा प्रकल्प तयार आहे, तो कार्यान्वित झाल्यास ३८ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होईल. त्यानंतर ४८८ कोटी रुपये खर्च करून चंदूर परिसरात १३ एमएलडी व टाकवडे वेस येथील एसटीपी प्रकल्प जागेत आणखी १९ एमएलडीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी टेंडर प्रसिध्द केले असून सर्व्हेही पूर्ण झाला आहे.