इचलकरंजी मतदारसंघास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट

विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी गुरूवारी इचलकरंजी मतदारसंघास भेट देऊन पाहणी केली. यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी कोरोची येथील मतदान केंद्राची पाहणी करून केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आणि मतदान केंद्रे सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना दिल्या.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंगरूम, मतमोजणी आणि मतदानासाठी आवश्यक साहित्य वाटप आणि स्विकारण्याचे काम राजीव गांधी भवन येथे होणार असल्याने सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांना दिल्या.

त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले आणि सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तसेच सर्व नोडल अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कामकाज योग्य पद्धतीने होईल तसेच आचार संहितेचा भंग होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी असे आदेश दिले. तसेच २०१९च्या विधानसभा निवडणूक आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या तुलनेत येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विशेष प्रयत्न करावेत अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांना दिल्या.