आमदार आवाडे यांच्या प्रयत्नाला यश! इचलकरंजीत हायमास्ट दिव्यांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर

इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून शहराचा औद्योगिक विस्तार झपाट्याने होत चालला आहे. त्या मानाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोयी-सुविधाही पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागातील चौकांमध्ये सौरऊर्जेवरील हायमास्ट दिवे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

या महत्वाकांक्षी कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठविण्यात आला. या कामासाठी आवश्यक 10 कोटीचा निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. या प्रयत्नांना यश मिळून राज्य शासनाने निधीही उपलब्ध करुन दिला आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही सुरु झालेली आहे.

वीज बिलामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीवर पडणारा मोठा आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून शहरातील मुख्य अशा 80 चौकांमध्ये सौरऊर्जेवरील हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. या माध्यमातून वीज बिलात दरमहा लाखो रुपयांची बचत होणार आहे. हायमास्ट दिव्यांमुळे संपूर्ण चौक उजाळून निघणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

शहरातील पंचगंगा नदीतीरावरील वरद विनायक मंदिर, मरगुबाई मंदिर, फडणीस हौद, लिंबू चौक, शहापूरसह विविध 80 ठिकाणी सौरऊर्जेवरील हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. सौरऊर्जेमुळे महानगरपालिकेच्या वार्षिक वीज बिलात सुमारे 25 लाख रुपयांची बचत होणार आहे. हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून सर्वच चौक उजळून निघणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.