विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! पाचवी, आठवीची 9 फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा; ‘या’ संकेतस्थळावर करता येईल 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी…..

शासनमान्य शाळांमधून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी व इयत्ता आठवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.या विद्यार्थ्यांची परीक्षा ९ फेब्रुवारी रोजी होईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

‘या’ संकेतस्थळावर करा नोंदणी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावरून विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत तर २३ डिसेंबरपर्यंत अतिविलंब शुल्कासह नोंदणी करता येणार आहे. तसेच अति विशेष विलंब शुल्कासह ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली आहे. अर्जदार विद्यार्थ्यांची ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वच जिल्ह्यांत एकाचवेळी परीक्षा होणार आहे.