मनोज जरांगेंचा मोठा डाव; अंतरवालीतून महत्त्वाची घोषणा, बैठकीत काय ठरलं?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र मनोज जरांगे पाटील आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही ठाम आहेत. मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला जोरदार विरोध होत आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आणि आचारसंहिता सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मोठा घोषणा केली आहे. जिथे निवडून येईल तिथे आपला उमेदवार उभा करा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर जिथे आपले उमेदवार निवडून येणार नाहीत तिथे जो उमेदवार मराठा आरक्षणाची बाजू मांडेल असं बॉन्डवर लिहून देईल त्याला निवडून आणा. नसेल लिहून  देत तर त्याला पाडा. जिथे एस्सी एसटीचे उमेदवार आहेत तिथे उमेदवार उभे करू नका, जो उमेदवार आपल्या विचाराचा असेल तर त्याला मत देऊन निवडून आणा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आता आपण बघणार आहोत कोणत्या जागेवर उमेदवार उभे करायचे, फॉर्म भरून घ्यायचे अर्ज मागं घेतला तरी पैसे बुडत नाहीत. कुठं मराठ्याची ताकद आहे, कुठे मुस्लिमाची ताकद आहे हे समीकरण जुळलं तरच त्याच्यात मजा आहे. मी समीकरण जुळवतोय, जर नाही जुळलं तर अवघड आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज भरून ठेवा. फॉर्म भरला की आपण सांगून देऊ यांना फॉर्म काढून घ्यायचा आहे, यांनी निवडणूक लढवायची आहे. तरीसुद्धा फॉर्म ठेवला तर आपण समजून घ्यायचं की त्यांनी पैसे घेतले आणि आपल्या विरोधात उभा राहिला. फॉर्म काढ म्हटलं की काढायचा तोपर्यंत समीकरण जुळतात का ते बघतोय. या चार-पाच दिवसात मी पटापट काम करतो आणि कोणत्या मतदारसंघात सीट निघते ते बघतो आणि कोणत्या मतदारसंघात पाडायचे ते सांगतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.