कबनूर येथील हॉटेल दुर्गांबा येथे शुक्रवारी सायंकाळी पाच व्यक्तींनी आपण ऑल इंडिया फूड डिपार्टमेंटचे अधिकारी असल्याचे सांगून हॉटेलमध्ये भेसळ होत असल्याचे सांगितले. याबाबत आपल्याकडे तक्रार आली असून, त्यानुसार हॉटेलमधील साहित्य आणि खाद्यपदार्थ तपासणीसाठी आल्याचे सांगितले. तपासणीनंतर हॉटेलवर कारवाई करण्याची धमकी दिली. कारवाई टाळण्यासाठी दहा हजार रुपये व दरमहा पंधरा हजार रुपयांची मागणी केली.
धमकी देऊन पाच हजार रुपये घेतले. संशयितांनी ऑल इंडिया अँटिकरप्शन पार्लमेंट कमिटी (भारत सरकार) असे लिहिलेली पाच हजारांची पावती दिली. फिर्यादीस संशय आल्यामुळे त्यांनी फूड अँड ड्रग्ज विभागाशी संपर्क करून माहिती घेतली. मात्र, अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे फिर्यादींनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. खंडणी उकळणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला.
याप्रकरणी पोलिसांनी मधुकर हिंदुराव कांबळे ( वय ५८, रा. भारतामाता हौसिंग सोसायटी, इचलकरंजी), अन्वेश सुरेश देशमुख (३७, रा. भिवसी, ता. चिकोडी), संगीता राजेंद्र कांबळे (४२, रा. कोरोची, ता. हातकणंगले), महादेव विनू कुरणे (४८, जवाहरनगर, इचलकरंजी) या चौघांना अटक केली; तर दत्तात्रय नाखिल हा फरारी आहे. याबाबतची फिर्याद हॉटेल मालक नवीन सुधाकर शेट्टी (४५, रा. कबनूर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली होती. संशयित मधुकर कांबळे, अन्वेश देशमुख यांना न्यायालयाने १४ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.