गेल्या दहा दिवसातील प्रचार पाहता विरोधकांनी विकासकामांवर न बोलता फक्त माझ्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली. मी टीकाटिप्पणीकडे फारसे लक्ष न देता मी पाच वर्षात काय काम केले आणि भविष्यात काय करणार आहे हेच सांगत राहिलो. वैयक्तिक टीका, टोमणे मारणे हा माझा स्वभाव नाही. या टीकेला हातकणंगलेची जनता मतदानातून योग्य तो उत्तर देईल असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांनी व्यक्त केला. पेठ वडगांव येथे मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेत असताना कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी तालुका अध्यक्ष भगवान जाधव, अभिजित गायकवाड, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, रमेश पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राजूबाबा आवळे म्हणाले, आपण ही निवडणूक विकास कामाच्या मुद्दावर लढवायची आहे. माझ्या विरोधात जिल्ह्याचे मोठमोठे नेते हातकणंगले मतदारसंघात सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीकाटिप्पणी न करता आपण केलेले काम सांगत जनतेसमोर जायचे निश्चित केले होते. त्याप्रमाणे पूर्णप्रचार काळात मी कोणत्याही नेत्यावर, गटावर टीका केली नाही. माझ्यावर अनेक वैयक्तिक हल्ले झाले, टीका झाली मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करत आपली भुमिका मांडत राहिलो. हातकणंगलेच्या विकासाला देखील मोठी चालना देण्याचा माझा संकल्प आहे. माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात नक्कीच उल्लेखनीय काम करू असा विश्वास आम. राजूबाबा आवळे यांनी व्यक्त केला.