कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीकडून उमेदवार देण्यामध्ये आघाडी घेतली असतानाच महाविकास आघाडीकडून सुद्धा आता उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर कोल्हापूरमधील लढतींचे चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. मात्र अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, कोल्हापूर उत्तर, चंदगड आणि इचलकरंजी या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिढा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी पहिल्या यादीमध्ये जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीचा चेहरा अजूनही ठरलेला नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य यादीमध्ये या मतदारसंघातून मदन कारंडे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र पहिल्या यादीमध्ये त्यांचं सुद्धा नाव आलेलं नाही.
त्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा कोणाच्या वाट्याला जाणार? याची उत्सुकता आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये अपक्ष निवडून आलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वत:च्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून पाठिंबा दिला जातो की त्यांच्या विरोधात उमेदवार दिला जातो याचेही उत्तर अजून मिळालेलं नाही.