आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार संघामध्ये प्रत्येक पक्षातील उमेदवारी याद्या प्रसिद्ध होत आहेत. तसेच मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज देखील दाखल होत आहेत. अशातच हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसला ही जागा सोडली आहे. मात्र महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या समोर दलित मित्र अशोकराव माने यांचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून नाव घोषित केले होते.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह बहुतांश मान्यवरांच्या राजकीय एकोप्याचे दर्शन घडले होते. जनसुराज्य पक्ष महायुतीचा घटक आहे. मात्र आता ऐनवेळी भाजपच्या गोटातून इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा सौ. अलका अशोक स्वामी यांची चाचपणी सुरू झाल्याने महायुतीत ठिणगी पडलेली आहे. त्यामुळे महायुतीचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला मिळणार हा तिढा मात्र कायम आहे.